
बीड दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हापरिषद पंचायत समिती गट गणांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्या पाठोपाठ आता नगरपालिका निवडणुकांच्या हालचालींना देखील वेग आला आहे. नगराध्यक्षांसाठीची आरक्षण सोडत सोमवारी होत असतानाच आता नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नगरपालिकानिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही आरक्षण सोडत होणार आहे.
राज्यात आता स्थानिक स्वरःज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हापरिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकाचवेळी हालचाली सुरु झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (दि. ६) मंत्रालयात होणार आहे. त्यासोबतच आता प्रत्येक नगरपालिकेतील नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी यासाठी सर्वत्र बैठक होणार आहे.
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक नगरपालिकेला एका उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावयाची असून त्यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत होणार आहे. अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्यातील महिला आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण सोडतीद्वारे काढले जाणार आहे.
नगरपालिका आरक्षणासाठी देखील पहिली निवडणूक हाच निकष आरक्षण चक्राकार पद्धतीने फिरविण्यासाठी जिल्हापरिषद पंचायत समितीच्या प्रमाणेच नगरपालिकांमध्ये देखील अंगांनी निवडणूक ही पहिली निवडणूक समजूनच आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात यापूर्वी कोणते आरक्षण होते याचा विचार केला जाणार नाही.