कपिलधारवाडीत जमिनीला पडले भगदाड,रस्ता कसा खचला पहा !
ग्रामस्त भयभीत,माळीन सारखी दुर्घटना होण्याची शक्यता.

बीड (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथे गेल्या आठ दिवसांपासून रस्ता खचत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या खचण्यामुळे काही घरांना तडे गेले असून काही घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीड शहरापासून अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावातील मुख्य रस्ता खचत असून रस्त्याला दोन तीन फुटाचे भगदाड पडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.मागील काही दिवसापासून असे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यंदा बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नदी, नाले, ओढे व तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक शेतीचे नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी परिसरातील जमीन भुसभुशीत झाली असून त्याचा परिणाम आता रस्त्याच्या खचण्याच्या रूपात दिसत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन केले असून, माळीनसारखी दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.तसेच ग्रामस्थांची पुनर्वसन करावी अशी देखील मागणी होत आहे.