कत्तलसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कारचा भीषण अपघात.
"देव तारी त्याला कोण मारी" कार मध्ये आढळले तब्बल १० जनावरे !

आष्टी (पवार प्रतिनिधी) कडा तालुक्यातील आष्टी जवळील अहिल्यानगर-जामखेड रोडवरील शेरी बुद्रुक येथील मुख्य महामार्गावर मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान दोन कारचा अपघात झाला. या अपघातातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कत्तलसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पर्दाफाश झाला आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातानंतर कारमध्ये गाईच्या वासरांचा मोठा गट आढळून आला. या वासरांचे पाय बांधलेले होते तसेच त्यांचे तोंडसुद्धा कापडाने घट्ट बांधण्यात आले होते, जेणेकरून त्यांचा आवाज बाहेर पडू नये. अक्षरशः मेंढ्या-शेळ्यांसारखे हे मुक्या प्राण्यांना कारमध्ये कोंबून नेले जात होते,असे दृश्य पाहून उपस्थित नागरिक संतापले.
अपघातात काही वासरे किरकोळ जखमी झाली असली तरी, बहुतेक प्राणी सुखरूप बचावले.“देव तारी त्याला कोण मारी,” अशीच भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेतून कत्तलखान्यांकडे होणारी जनावरांची अमानुष वाहतूक उघड झाली आहे.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, वाहन नेमके कुठून आले होते व कोणत्या कत्तलखान्याकडे जात होते, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना या प्रकरणाचा मागोवा घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे यांनी संताप व्यक्त करत, “मुक्या प्राण्यांचा जीव घेणे, अवैध वाहतूक करणे आणि छळ करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित चालक, वाहनमालक तसेच प्राण्यांची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.
तर प्राणिमित्र नितीन आळकुटे यांनी सुद्धा या प्रकारची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
या अपघातातून केवळ वाहतूक अपघात नव्हे, तर अमानुषपणे जनावरांची तस्करी आणि छळ यांचा भयानक चेहराही समोर आला आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणाचा पुढील सत्य उघड होण्याची शक्यता आहे.