गुटख्याच्या गोडाउनवर पोलिसांचा छापा.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,2 लाख 41 हजाराचा गुटखा जप्त.

बीड(प्रतिनिधी)राज्य सरकारने गुटखा व तंबाखू जन्य पदार्थावर बंदी घातली असून बीड जिल्ह्यात मात्र राजरोस गुटखा विक्री होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवायाने गुटखा विक्रीला लगाम लागल्याचे दिसत आहे.
बीड शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. शहरातील झमझम कॉलनी येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २ लाख ४१ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये मोठा साठा असलेला अवैध गुटखा जप्त केला. या जागेच्या मालकाची चौकशी केली असता, ती रहमत उल्ला सय्यद रजा उल्ला सय्यद याच्या मालकीची असल्याचे समोर आले. रहमत उल्ला सय्यद याने आपला भाऊ अजमत उल्ला सय्यद याच्यासोबत मिळून हा गुटख्याचा व्यवसाय चालवत असल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, अजमत उल्ला सय्यद हा जिल्ह्यातील मुख्य गुटखा माफिया असून, तो संपूर्ण बीड जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी हवालदार गोविंद राख यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, युनूस बागवाण, राहूल शिंदे, अंकुश वरपे, आलिम शेख, गोविंद राख, बबन सलगर, स्वाती मुंडे आदींच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.