डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू !
पोलीस अधीक्षक कार्यालयात नातेवाईकांचा आक्रोश;गुन्हा दाखल करण्याची मागणी

बीड( प्रतिनिधी)नगर रोडवरील आई हॉस्पिटल येथे आज दुपारी उपचारासाठी दाखल झालेल्या २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत जबाबदार डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
मृत तरुणीचे नाव सय्यद नाजमीन फयाज (रा. पुणे, सध्या मुक्काम मांजरसुंबा) असे आहे. ती टेस्ट ट्यूब बेबी उपचारासाठी आई हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तपासण्या करण्यासाठी तिला आत नेण्यात आले; मात्र अवघ्या वीस मिनिटांत तिला व्हेंटिलेटरवर बाहेर आणण्यात आले. स्थिती गंभीर असल्याचे सांगत डॉक्टरांनी तातडीने दीप हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत आक्रोश व्यक्त केला. त्यांनी मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलीस अधीक्षक कार्यालयात आणला. जबाबदार डॉक्टरांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेकडो नातेवाईक व नागरिकांनी कार्यालयासमोर गर्दी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी नातेवाईकांशी चर्चा केली. त्यांनी, “प्रथम मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येईल. अहवालानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हा दाखल करण्यास पोलिस तयार आहेत,” असे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून पोस्टमार्टम प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, या घटनेमुळे खाजगी रुग्णालयांमधील उपचार पद्धती व रुग्ण सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नातेवाईकांची मागणी, उपस्थित प्रश्न?
*उपचारादरम्यान नक्की कोणती तपासणी केली जात होती?
*शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात आली होती का?
*भूल जास्त झाल्याने मृत्यू झाला का?
*की उपचारात गंभीर निष्काळजीपणा झाला?