शाहूनगर भागातील घरात,दुकानात घुसले पावसाचे पाणी;नागरिक आक्रमक !
शाहूनगर भागातील समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करणार : माजी नगरसेवक दत्ता जाधव.

बीड: बीड शहरातील जालना रोडलगत असलेल्या शाहूनगर भागात पावसामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. पावसाचे पाणी घरात ,दुकानात घुसल्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.तीन दिवसापासून नागरिक मोटार लावून पाणी बाहेर काढत आहे.
“स्वच्छ शहर, सुंदर शहर” ही केवळ घोषणा राहिली असून प्रत्यक्षात बीड शहराच्या विकासाचे दावे फोल ठरत आहेत, अशी टीका नागरिकांनी केली आहे. शाहूनगर भागाला दरवर्षी पावसाळ्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. वारंवार नाला साफसफाई आणि पाणी निचरा करण्याची मागणी करूनही त्याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर शाहूनगर भागातील नागरिकांनी आज बीड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. दोन दिवसांच्या आत पाणी निचऱ्याची ठोस उपाययोजना न केल्यास नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
👉 माजी नगरसेवक दत्ता जाधव आक्रमक.
वेळेवर नाला साफसफाई होत नसल्याने दरवर्षी पाणी घरात शिरते.यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.
प्रशासन फक्त कागदोपत्री योजना दाखवते, प्रत्यक्ष काम शून्य.
पिढ्यान् पिढ्या विकासाचे आश्वासन मिळाले पण प्रश्न मात्र आजही तसेच आहेत.
या भागातील माजी नगरसेवक व नागरिक आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना भेट घेऊन समस्या सांगत निवेदन देण्यात आले.मुख्याधिकारी फडसे हे शाहूनगर भागाला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.दोन दिवसात या पाण्याचा निचरा करण्यात आला नाही तर आंदोलन करणार असल्याचे माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. दोन दिवसांत नगरपालिका काय पावले उचलते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.