बीड पंचायत समिती कार्यालयाकडून महिलांच्या स्वच्छतागृहाला कुलूप !
पाणी नसल्याचे कारण देत प्रशासनाची टाळाटाळ; स्वच्छ भारत मिशनला हरताळ.

बीड : (दि. १७) बीड पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिला अभ्यागतांसह कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह ‘पाणी नाही’ या कारणावरून बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी “बाहेरील शौचालय वापरा” अशी लाजिरवाणी सूचना प्रवेशद्वारावर लावून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे स्वच्छतागृहात दुर्गंधी येत असल्याने कार्यालयात आलेल्या अभ्यागतांनी बाहेरील स्वच्छतागृह वापरावे.”
ग्रामीण भागातून कार्यालयात येणाऱ्या महिलांसाठी बाहेर शौचालय शोधणे हे अत्यंत गैरसोयीचे असून सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. तसेच कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना यामुळे मोठी अडचण भासत आहे.
महिलांच्या आरोग्याच्या आणि गोपनीयतेच्या दृष्टीने स्वच्छतागृह ही मूलभूत गरज असून शासकीय कार्यालयांनी ती सुविधा कायम ठेवणे बंधनकारक आहे. पाणीपुरवठा नसल्यानं सुविधा बंद ठेवणे ही प्रशासनाची अनास्था असल्याचे स्पष्ट दिसते. पाणीपुरवठा सुरळीत करणे, स्वच्छता राखणे आणि दुर्गंधी दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, नागरिकांना गैरसोयीच्या स्थितीत ठेवणे अमान्य आहे.
एकीकडे शासन स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा करते, कोट्यवधी रुपयांचा निधी वापरते; तर दुसरीकडे महिलांसाठी असलेले शासकीय स्वच्छतागृह बंद ठेवले जात आहे — ही बाब स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासणारी आहे.
या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दि. २० ऑक्टोबर, सोमवार रोजी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देत प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे.
तसेच, या प्रकरणी लाडक्या बहिणींची हेळसांड करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित पवार यांना लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.