बीडमध्ये पिस्टल लावून फिरणाऱ्या दोघांना पाठलाग करुन पकडले.
शिवाजी नगर पोलिसांची कारवाई,बीड मध्ये पिस्टल पुरवणाऱ्याचा शोध पोलिसांनी घ्यावा.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात तरुणाकडे मोठ्या प्रमाणात पिस्टल सापडत असून याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
बीड शहरातील गोविंद नगर, धानोरा रोड भागात कमरेला पिस्टल लावून मोटारसायकलवर फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान याच्याविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ६ तर स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपनदार अशोक पाखरे याच्याविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात ८ गुन्हे दाखल आहेत.
बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पो.नि. किशोर पवार यांना माहिती मिळाली की दोघे जण मोटारसायकलवर पिस्टल लावून फिरत आहेत, त्यानुसार पोलिसांनी गोविंद नगर येथील सिमेंट रोडवर सापळा लावून मोटारसायकल क्रमांक एम.एच.१४ एच ए १६०८ यावरुन येत असलेल्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना पाहून मोटारसायकल चालू स्थितीत सोडून ते कर्परा नदीच्या दिशेने पळू लागले, त्याचवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन कि.मी. नदीतून पाठलाग करत दोघांना पकडले. यावेळी पोलिसांनी सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (वय २५) गोविंद नगर धानोरा रोड बीड याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. पोलिसांनी स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपनदार अशोक पाखरे (वय ३०) रा. भिंगार जि. अहिल्यानगर यालाही ताब्यात घेतले. त्याच बरोबर मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. यात दोघांविरुद्ध चोरी, जबरी चोरी, घरफोडी, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर ठाण्याचे पो. नि. किशोर पवार, स.पो.नि. दुनघव, क्षीरसागर, पोलीस कर्मचारी आघाव, मराडे, येवले, रहाडे, महानोर, आगलावे, सानप, कांदे यांनी केली.बीड जिल्ह्यात पिस्टल मिळून येत असून याचा मुख्य “आका” कोणाचे कोण पुरवठा करतंय याचा तपास कारणाची गरज बीड पोलिसांना आहे.