
दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपीला शहरातील संभाजीनगर भागातून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.२०) केली आहे. हा जेरबंद सराईत गुन्हेगार असून त्यावर दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शुक्रवारी दि.२० बालेपीर भागातील महादेव भगवान दळवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घरासमोरुन अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याची तक्रार केली होती. याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना माहिती मिळाली की, ती दुचाकी अतुल विक्रम वाघमारे याने चोरली आहे. तो सध्या त्याच्या रहात्या घराजवळ संभाजीनगर भागात आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकाने संभाजीनगर भागात धाव घेऊन अतुल वाघमारे यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्याची चौकशी केली असता त्यांने बालेपीर भागासह शहरातील विविध भागातून ५ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या ५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यास शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतुल विक्रम वाघमारे याच्यावर दरोड्या सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, भागवत शेलार, दिपक खांडेकर, आशपाक शेख, चालक संजय जायभाये यांनी केली आहे.