मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा पोलिसांच्या ताब्यात.
API बाळराजे दराडे यांची कारवाई.

बीड शहरा लगत असणारे डोंगर पोखरुन अवैध रित्या मुरूम उत्खनन व वाहतूक केली जात आहे याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.यामुळे डोंगराची अक्षरशः चाळण झाली आहे.
दिनांक २१ शनिवार रात्री नगर रोडवर रात्री कारवाई करुन मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा पकडण्यात आले असून, या चारही चालकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे हे कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, नगर रोडवरुन काही हायवा मुरुमाची चोरटी वाहतूक करीत आहेत. ही माहिती मिळताच सपोनि बाळराजे दराडे यांनी नगर रोडवर जिओ पेट्रोल पंप येथे सापळा लावला असता येथून जाणारे हायवा थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये मुरुम आढळून आले. त्यामध्ये MH-16-CC-7135 चालक संजय सुरेश चितळकर रा. बागिपंपळगांव ता. गेवराई हा पकडला व त्याचे समोर चालत असलेल्या दोन हायवा क्र. MH-23-AU-1741 चालक अक्रम आयुब पठाण, रा चांदीदली मुंबई, MH-23-AU-2785 चालक सतीश नामदेव सौंदरमल रा. बागिपंपळगाव ता. गेवराई, तर चौथा हायवा MH-23 AL-011 चालक ऋषीकेश केंगर रा. मुर्शेदपूर ता.जि. बीड हा मुरुम खाली करुन पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करुन पकडला आहे. हे चारही हाय ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून, ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली आहे. पण या चारही चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, पोलीस हवालदार अतिश मोराळे, पोलीस नाईक नामदेव सानप, पोलीस शिपाई राठोड चालक पवार यांनी केली आहे.