त्या सावकारा विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सावकारावर गुन्हा दाखल झाल्यावरच प्रेत ताब्यात घेणार असा पवित्रा कुटुंबाने घेतल्याने गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)खाजगी सावकरांची नावे चिठ्ठत लिहून एका तरूण कापड व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी काळा हनुमान ठाणा पेठ बीड भागात उघडकीस आली. सदरील तरूणाने लिहिलेल्या चिठ्ठीत काही राजकीय पक्षाशी संबंधीत पदाधिकाऱ्यांकडून व इतर सावकारांकडून पैसे घेतल्याचा उल्लेख असून त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमुद असल्याचे समजते.
बीड शहरातील काळा हनुमान ठाणा, पेठ बीड भागातील राम दिलीप फटाले (वय ४२) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. राम फटाले हे कपड्याचा व्यवसाय करत होते. जिल्ह्यातील आठवडी बाजारातही ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कापड व्यावसायासाठी त्यांनी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्या सावकारांना वेळेवर व्याज देवूनही त्यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता. जोपर्यंत संबंधित सावकारांविरुध्द कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्या सावकारावर गुन्हा नोंद झाल्यावर अखेर दुपारी उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मयत राम फटाले यांन आत्महत्यापुर्वी चार पानाची एक चिठ्ठी मध्ये त्या सावकारांची नावे लिहून ठेवली होती त्या सावकारां विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक माहितीसाठी पुढील तपास पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.