बीड शहरातील सोमेश्वर नगरला आले तळ्याचे स्वरूप
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने विद्यार्थ्यांना,नागरिकांना पायी चालणे देखील झाले मुश्किल.

बीड शहरात नगरपालिकेने पावसाळापूर्वी नाले,गटारी साफसफाई न केल्याने शहरातील अनेक भागातील,गल्लीतील नाल्या तुंबून नालीतील पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्याला पावसाने एक महिन्यांच्या विश्रांती नंतर मध्यरात्री काही प्रमाणात पाऊस झाल्याने बीड शहरातील बार्शी रोडवरील सोमेश्वर नगर ला तळ्याचे स्वरूप आले असून सोमेश्वर नगर कमानि मध्येच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना व स्थानिक नागरिकांना पाण्यातून जावे लागत आहे.
बार्शी रोडच्या दोन्ही बाजूस नाली नसल्यानेच पाणी तुंबत असून रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाले असल्याने मुख्य रस्त्याला देखील तळ्याचे स्वरूप आले आहे.यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे.
सोमेश्वर नगर भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यानेच या भागात जागोजागी कचऱ्याचे ढीग असून,पथदिवे बंद आहेत.लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक जवळ आल्यावरच या भागात लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत का?असा सवाल स्थानिक नागरिक करत असून नगरपालिकेच्या ढिसळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.