नातवाने केलेल्या हल्ल्यात आजी ठार,आई,वडील गंभीर जखमी.
नशेच्या आहारी गेलेल्या मुलाचा कुटुंबावर हल्ला.

बीड(प्रतिनिधी)परळी येथील नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने आज्जीवर पैशासाठी जीवघेणा हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळ जनक घटना तलाब कट्टा फूले नगर परिसरात सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.या हल्ल्यात आजी ठार झाली असून संभाजी नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
परळी शहरातील तलाब कट्टा भागात राहणाऱ्या कुरेशी कुटुंबातील 80 वर्षीय जुबेदा इब्राहिम कुरेशी घरात बसलेल्या असताना अरबाज रमजान कुरेशी हा वीस वर्षीय नातू नशेत घरी आला. अरबाजने आजीकडे पैशाची मागणी केली. आजीने पैसे देण्यास इन्कार केला. शिवीगाळ करूनही आजी पैसे देत नाही म्हणून संतप्त झालेल्या अरबाजने हातात असलेल्या सत्तूरने आजीच्या तोंडावर वार केला. यावेळी झालेल्या गोंधळाचा आवाज ऐकून अरबाज ची आई समीना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी हे दोघेही धावत आले. अरबाज ने केलेल्या हल्ल्याने आजी अत्यावस्थ स्थितीत गेली. आई आणि वडील धावून आल्याचे पाहताच अरबाज याने त्या दोघांवरही हल्ला चढवला. यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर अरबाज पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.मात्र घटना घडल्यानंतर काही क्षणातच संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले. पोलीस निरीक्षक संजय ढोणे यांनी ताबडतोब कारवाई करत आरोपीला पकडून जखमी वृद्ध आजीला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. तर आरोपीच्या आई-वडिलाला प्राथमिक उपचार करून त्यांना देखील अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.संभाजी नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.