
अंबाजोगाई(प्रतिनिधी) शहराच्या मंडी बाजार भागात असलेल्या ‘फेमस’ फर्निचर या शॉपिंग मॉलला अचानक आग लागून संपूर्ण मॉल भस्मसात झाला. ही घटना शहरात मंगळवारी सकाळी घडली आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, गादीचे साहित्य, कपडे व इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आग वेगाने पसरली.
या आगीत मॉलमधील सर्वच साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून, विद्युत शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशामक विभागाने पंचनामा सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे.