वायरमन सह खाजगी इसम लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात.
सोलर कृषीपंप मंजुरीचा सर्वेसाठी मागितली लाच.

बीड दि. २१ (प्रतिनिधी):- राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी भरमसाठ वीजबिल पासून सुटका होण्यासाठी “मागेल त्याला सोलार कृषी पंप”योजना सुरू केली आहे.या योजने अंतर्गत अर्ज केल्यानंतर तो मंजूर होताच सर्व्हे करुन देण्यासाठी वायरमन तेलगाव (ता. माजलगाव) येथील वायरमन गणेश आघाव आणि खाजगी इसम भागवत कोके या दोघांना अडीच हजार रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील तक्रारदाराने मागेल त्याला सोलार कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केला होता. सदरील अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या नाकलगाव शिवारातील सर्व्हे नंबर ८४ मधील शेतात असलेल्या बोअरवेलचा सर्व्हे करुन देण्यासाठी तेलगाव येथील वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गणेश हरिचंद्र आघाव (वय ४०), रा. पंचशिल नगर, शिवाजी चौक,
परळी आणि खाजगी इसम भागवत रामभाऊ कोके (वय २६, रा. नाकलगाव ता. माजलगाव) यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणीची पडताळणी करुन वायरमन आघाव यांनी तडजोडीअंती २५०० रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच खाजगी इसम कोके यांनी आघाव यांना लाच रक्कम मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या अनुषंगाने दोघांवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगिरी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पो. नि. राहुलकुमार भोळ, सहाय्यक फौजदार सुरेश सांगळे, पो.हे.कॉ. पांडुरंग काचगुंडे, मच्छिंद्र बीडकर, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.