प्रा.हाकेसह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
"कायदा हातात घेणारांवर कठोर कारवाई केली जाईल" बीड पोलीस अधीक्षक : नवनीत कॉवत.

बीड(प्रतिनिधी)बीड दि. 25/08/2025 रोजी गेवराई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 17:40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गेवराई, बीड येथे घडली.
दिनांक 25/08//2025 रोजी प्रा. लक्ष्मण हाके हे गेवराई येथे येणार होते त्यामुळे पोलीसांनी प्रा. हाके यांनी गेवराई शहरात येवू नये यासाठी त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावली होती. मात्र, तरीही प्रा. लक्ष्मण हाके यांनी पोलीसांचा आदेशाला न जुमानता ते आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराई शहरात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले. चौकात थांबुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याच वेळी काही लोक प्रा. हाके यांचा निषेध करत होते. पोलिसांनी प्रा. हाके यांना पुढील प्रवासासाठी निघून जाण्याची सुचना केली असता, प्रा. हाके व त्यांचे कार्यकत्यांनी पोलीसांच्या सुचनांकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आणि ते तिथेच थांबले. यावेळी, प्रा. हाके यांच्यासोबत असलेल्या सुनील ढाकणे नावाच्या व्यक्तीने आपल्या पायातील चप्पल काढून जमावाच्या दिशेने फेकली. यामुळे दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी झाली आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बळीराम खटके यांनीही जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार समर्थकांनी प्रा. हाके यांच्या दिशेने दगड आणि चप्पला फेकल्या. दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवले आणि प्रा. हाके यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या घटनेनंतर, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवुन 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रा. लक्ष्मण हाके, सुनील ढाकणे, बजरंग सानप, बळीराम खटके, पवन कारवार, सिध्दू पघळ, मुक्ताराम आव्हाड, शिवाजी गवारे, दत्ता दाभाडे, अशोक बोरकर, वसीम फारुखी, शाहरुख पठाण, संतोष सुतार आणि मोईन ख्वाजा शेख यांचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी घेतलेल्या कठोर भुमिकेमुळे मोठा अनर्थ टळला. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि कोटकर करीत आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा:
“जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणारा कोणीही असला तरी त्याची अजीबात गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था हातात घेणारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल” असा इशारा बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.