वैद्यकीय अधिकाऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या.
ड्यूटीवर जातो म्हणून घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही.

बीड(प्रतिनिधी)वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुण डॉक्टरने देटेवाडी येथील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने वडवणी तालुक्यात खळबळ उडाली असून, अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवार (दि.५) पासून डॉक्टर होते मिसिंग, मृतदेहाचे बीड येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.डॉ. शुभम बालकनाथ यादव रा. देवळा (ता. अंबाजोगाई) हल्ली मुक्काम बीड असे मयत डॉक्टरचे नाव आहे. ते शुक्रवारी (दि.५) सकाळी घरी मोबाईल ठेवून घरातून ड्यूटीला चाललो म्हणून बाहेर पडले पण घरीच पोहोचले नाही. अनेक ठिकाणी शोध घेतला असता काहीच ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबाने हरवल्याची तक्रार दिली होती. परंतु वडवणी तालुक्यातील देटेवाडी येथील तलावात आज एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता ते डॉ. शुभम यादव असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी आत्महत्या केली असावी असा निष्कर्ष लावला जात आहे. ही घटना वडवणीमध्ये वाऱ्या सारखी पसरली आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांचे मुळ गाव देवळा (ता. अंबाजोगाई) गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह बीड येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला होता. परंतु या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर डॉक्टर तरुणाने असे अचानक आयुष्य संपविल्याने कुटुंबाला धक्का बसला असून आक्रोश सुरू होता. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून तपासातून कारण स्पष्ट होईल.या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावावर शोककळा पसरली आहे.