ब्रेकिंग न्यूज

पाली ग्रामपंचायतचे दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा महत्त्वपुर्ण निर्णय.

बीड(प्रतिनिधी)अर्जदार महेंद्र रघुनाथ वीर, उपसरपंच, ग्रामपंचायत पाली, ता. जि. बीड व बापु शिवाजी नवले यांनी मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) व कलम १६ प्रमाणे पाली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंचाचा दिर व ग्रामपंचायत सदस्य संदिप सखाराम नवले व ग्रामपंचायत सदस्य शेख सुलताना शेख शिकुर यांचे विरूद्ध ग्रामपंचायत निधीचा स्वतःचे नावे रक्कमा उचलून अपहार केल्या बाबत प्रकरण सन २०२३ मध्ये दाखल केले होते. सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन साहेब, जिल्हाधिकारी, बीड यांनी दिनांक १०-०९-२०२५ रोजी न्यायनिर्णय देऊन सदरचे दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले आहे.

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, पाली ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १३ +१ सरपंच अशी आहे. पाली ग्रामपंचायतची निवडणुक दि.१३-१२-२०२२ रोजी झालेली आहे. पाली ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून श्री. महेंद्र रघुनाथ वीर यांची निवड झालेली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पाली ग्रामपंचायतमध्ये असलेले सरपंच मंजुषा शैलेंद्र नवले व त्यांचा दीर ग्रामपंचायत सदस्य संदिप सखाराम नवले हे सरपंचाशी संगनमत करून पाली ग्रामपंचायतच्या अनेक जनहिताच्या कामाच्या रकमा स्वतःच्या नावे व ग्रामपंचायत सदस्य शेख सुलताना शेख शिकुर यांचे नावाने उचलून अपहार करत असल्याचे कळाले. त्यावरून अर्जदार उपसरपंच महेंद्र रघुनाथ वीर व बापु शिवाजी नवले (जागरूक मतदार) यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात सन २०२३ मध्ये वर नमूद प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात तीन जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली.

सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने सादर केलेला सबळ लेखी व तोंडी पुराव्याआधारे मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन साहेब यांनी पाली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंचाचा दिर व ग्रामपंचायत सदस्य संदिप सखाराम नवले व ग्रामपंचायत सदस्य शेख सुलताना शेख शिकुर यांना दिनांक १०-०९-२०२५ रोजी सविस्तर निर्णय देऊन अपात्र ठरवलेले आहे. मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या सदर निर्णयामुळे बहुतांश ग्रामपंचायतमधील निधीचा अपहार रोखण्यास मदत होणार आहे व अपहार करणाऱ्या पृवृत्तींवर जरब बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक होईल, अशी अपेक्षा आहे.

सदर प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. एन. एल. जाधव, हायकोर्ट, औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अॅड. सतिश अजिनाथराव गाडे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. राजेश जाधव, अॅड. विवेक डोके, अॅड. सुधीर जाधव, अॅड. एस. आर. रूचके, अॅड. सागर नाईकवाडे, अॅड. कुलदीप गावडे यांनी सहकार्य केले.प्रकरणाच्या निकालाकडे पाली परिसरातील व बीड तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button