फटाक्यांतील बारूद काढून पेटवल्याने बालक गंभीर भाजला.
डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने,दृष्टी गमावण्याची शक्यता.

बीड(प्रतिनिधी) महाराष्ट्रात तसेच देशात दिवाळी हा एकमेव सण नागरिक मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करतात.
दिवाळी सण साजरा करत असताना फटाक्याची आतिषबाजी केली जाते. परंतु फटाके वाजवताना काळजी न घेतल्याने निष्काळजीपणाचे गंभीर रूप बीड शहरातील नागोबा गल्ली समोर आले आहे.
राजेश राजेंद्रसिंह शिकलकरी या आठ वर्षीय बालकाने न फुटलेल्या फटाक्यातील पावडर (बारूद) कागदावर काढून ती पुन्हा पेटवली. त्यावेळी बारूद पेटल्याने तीव्र ज्वाला निघाल्या आणि राजेशच्या चेहऱ्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्याच्या कॉर्नियाला गंभीर जखम झाली असून दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे.
ही घटना दिनांक 20 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी घराजवळील अंगणात घडली. न फुटलेल्या फटाक्यात काय आहे हे पाहण्याची बालसुलभ उत्सुकता राजेशला महागात पडली. स्फोट झाल्यानंतर घरच्यांनी त्याला तत्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील नेत्रतज्ज्ञांकडे हलविण्यात आले आहे.
बालरोग तज्ञ डॉक्टर जानवळे काय म्हणाले.
डॉक्टर जाणवडे यांनी पालकांना सावधतेचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की,“फटाके वाजवताना मोकळ्या जागेत, ज्वलनशील वस्तूंंपासून दूर आणि मोठ्यांच्या देखरेखेखालीच फटाके फोडावेत. फटाके फोडताना नेहमी पायात चप्पल किंवा बूट घालावेत व डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरावा.”
डॉ. जानवळे यांनी पुढे सांगितले की, फटाक्यांची चुकीची विल्हेवाट टाळा. वापरलेले फटाके पूर्णपणे थंड झाल्यावरच वाळूच्या बादलीत किंवा पाण्यात टाका. न पेटलेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका, अशी सूचना त्यांनी दिली.
मोकळ्या जागेत, इमारती, वाहने व झुडपांपासून दूर फटाके फोडा. जमिनीवरील फटाक्यांसाठी किमान ३० फूट आणि आकाशात उडवायच्या फटाक्यांसाठी १०० यार्ड अंतर ठेवा. अल्कोहोलच्या प्रभावाखाली फटाके फोडणे टाळा. धुराचे फटाके वापरणे टाळल्यास पर्यावरण व श्वसनाच्या आजारांपासून संरक्षण मिळते अशी मार्गदर्शनपर सूचना डॉ. जानवळे यांनी केली.
या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेशच्या उपचारासाठी नागरिकांनी सहानुभूती व्यक्त केली असून, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी फटाके फोडताना अत्यंत खबरदारी घ्यावी,असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.