
बीड शहरातील काही भागांमध्ये गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने बीड शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल होत असून याकडे नगरपालिका मुख्याधिकारी,प्रशासक व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या बीड शहरात पाहायला मिळत आहे.
ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणी मिळत नसल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. बीड शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून मडक्याचे तोरण बांधले व नगरपालिकेच्या दारातच मडके फोडून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला होता तरीही मुख्याधिकारी व प्रशासक यांना जाग आली नाही.
रात्री 10 वाजता धानोरा रोडवरील पाण्याच्या टाकीवर चढून काही युवकांनी शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, जोपर्यंत या पानाच्या टाकीमध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. बीड नगरपालिका मुख्याधिकारी कडे वेळोवेळी निवेदने देऊन देखील शहरवासीयाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात मुख्याधिकारी उदासीन असल्याचे दिसत आहे. पाण्याच्या टाकीवर चढून अविनाश कांबळे,पंकज धांडे, अक्षय दळवी या युवकांनी आंदोलन केल्याने आता तरी पाणीपुरवठा सुरळीत होईल का?असा प्रश्न बीड शहरवासियांना पडला आहे.