माजी आमदार सुनील धांडे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुनील धांडे यांना कोणती जबाबदारी देणार?

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा गावापर्यंत पोहोचवणारे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे यांनी अचानक ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला.
बीड जिल्ह्यात सुरेश नवले यांनी शिवसेने विरुद्ध बंड केल्यानंतर प्राध्यापक सुनील धांडे यांनी या जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचे काम केले. जिल्ह्यातील गावागावात जाऊन धांडे सरांनी शिवसेनेचा विचार जिवंत ठेवला.त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघातून धांडे विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेचा ढाण्या वाघ ही त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे.मधल्या काळात ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले या ठिकाणी त्यांना लोकसभा प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पक्षाची दिवसेंदिवस होत असलेली पिछेहाट पाहून तसेच पक्षनेतृत्वाकडे सामान्य शिवसैनिकांना भेटण्यासाठी वेळ नसल्याने अखेर प्राध्यापक धांडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतले आहे. काल मुंबई येथे मंत्रालयात नामदार शिंदे यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्राध्यापक धांडे यांचे अत्यंत जवळचे मित्र तथा कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक सुनील धांडे यांचे चिरंजीव तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम धांडे यांनीही शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या सेनेचे भगवे वादळ येणार हे आता निश्चित असून प्राध्यापक धांडे यांच्यासारखा एक अत्यंत प्रभावी संघटक पक्षाला मिळाल्यामुळे जिल्हाभरातील असंख्य शिवसैनिक आता शिंदेंच्या या प्रवाहात सामील होताना दिसू लागतील .त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्राध्यापक सुनील धांडे यांच्यावर आता कोणती जबाबदारी देतात याकडेही बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.