ताज्या घडामोडी

पंकजा मुंडे निवडून न आल्यास सचिन गेला म्हणणार्‍या सचिन मुंडेचा अपघाती मृत्यू!

खरोखर अपघात की आत्महत्या? घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ

लातूर : लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांनी भावनिक होऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पक्षफुटींमुळे देखील यंदाची निवडणूक भावनिक पातळीवर लढवली गेली. यात बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांची अटीतटीची लढत झाली. या लढतीत बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. यानंतर दोन दिवसांनी वातावरण निवळले, पंकजा मुंडे यांनीही झालेला पराभव स्विकारत कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, यानंतर घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.

‘पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला’ असा व्हिडीओ करणारा तरुण सचिन मुंडे याचा अपघाती मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे अपघात झाला त्यानुसार ही आत्महत्याच असल्याची चर्चा केली जात आहे. पंकजा मुंडे निवडून न आल्याच्या दुखाःत सचिन मुंडे याने आपले शब्द खरे केल्याचा अंदाज बांधला जात आहे.

 

कोण आहे सचिन मुंडे?

सचिन कोंडिबा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहिवासी होता. सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडीओ त्याने तयार केला होता. त्यानंतर आता शुक्रवारी ७ जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला.

 

नेमकं काय घडलं?

अहमदपूर इथून येलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एसटी महामंडळाची बस नित्यनेमाने निघाली होती. बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बसचालकाला रस्त्यावर पडलेला इसम दिसला. घाईत बस चालकाने गाडी वळवली. समोरच्या चाकापासून संरक्षण करता आलं मात्र मागील चाक सचिन मुंडे यांच्या अंगावरून गेलं. या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली. किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

पोलीस आणि एस टी महामंडळाच्या वाहनचालकांच्या माहितीनुसार हा अपघात आहे. मात्र सचिन मुंडे यांनी काही दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ आणि आजची घटना याची सांगड घालून पंकजा मुंडे यांच्यासाठी सचिन मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं सत्य काय याबाबत आता उलटसुलट चर्चा होत आहे

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button