
बीड (प्रतिनिधी) – शहरातील शाहू नगर भागात कमरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या १८ वर्षीय युवकाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आली असुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या विरूध्द कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांना माहिती मिळाली की एक युवक शाहू नगर भागात कमरेला गावठी पिस्टल लावून उभा आहे. त्यानुसार पोलीसांनी त्या ठिकाणी कारवाई करत जुबेर जावेद सय्यद (वय १८ रा. हनुमान चौक, शाहू नगर बीड) याच्यावर झडप घालून पकडले. यावेळी त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, पोना/बाळु सानप, पोकॉ/अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, चालक/सिध्देश्वर मांजरे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.