पेठ बीडमध्ये १ लाखाचा गुटखा पकडला.
अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष,पेठ बीड अवैध धंद्याचे हॉटस्पॉट.

बीड दि.१३ (प्रतिनिधी)राज्य सरकारने गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थावर बंदी कायदा केला असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र राजरोस गुटखा विक्री होत असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
पेठ बीड भागातील भोई गल्ली येथील एका घरात पोलिसांनी छापा टाकून १ लाख ९ हजार १७ रुपयांचा गुटखा व १ मोटारसायकल असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी गुटख्याची साठेबाजी करणाऱ्या ठिकाणावर छापा मारला मात्र दोन्ही आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले. पेठ बीड पोलीस ठाण्याचे पो. नि. अशोक मुदीराज यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भोई गल्ली येथील एका घरामध्ये छापा टाकला.
त्या ठिकाणी शेख खदीर शेख बशीर, शेख अरसलान शेख खदीर हे गुटख्याची साठेबाजी करुन त्याची विक्री करत असल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून १ लाख ९ हजार १७ रुपयांचा गुटखा व मोटारसायकल क्रमांक एम.एच.२३ ए.एन. ६३३६ असा एकूण १ लाख ३९ हजार १७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र पोलीस आल्याचे पाहून दोन्ही आरोपी पळून गेले.या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक मुदीराज,पो.ह.रमेश,पोलीस अंमलदार अल्ताफ, चालक अनिल यांनी केली.