
बीड(प्रतिनिधी)बीड स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरावर कारवाईचा धडाका लावला असून, आज गुरुवारी मांजरसुंबा येथे एका घरावर छापा मारुन सराईत दुचाकी चोराला जेरबंद करुन त्याच्या ताब्यातून – चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी बीड जिल्ह्यातील आणि सोलापूर येथून चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहे. शहरात चौका-कात पोलीस आणि कोट्यावधी रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचे लाइव्ह लोकेशन पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहता येते. एवढी सर्व तगडी यंत्रणा असताना दुचाकी चोर या सर्वांवर भारी ठरत शहरातून बिनदिक्कत दुचाकी चोरुन घेऊन जात आहेत. यात त्यांना नेमका कोणाचा सहारा मिळतोय हा संशोधनाचा विषय आहे. पण हे एकप्रकारे बीड पोलिसांना आव्हानच मानले जाते. यामुळे याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दुचाकी चोरीचे गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. या अनुशंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने मागील चार-पाच दिवसांत अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून आरोपी जेरबंद करीत अनेक दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुप्त मिळालेल्या माहितीनुसार मांजरसुंबा येथील एका घरावर छापा मारुन चोरीच्या दीड लाख रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या दुचाकी जप्त करीत आरोपी गोकुळदास मगर बोरगे रा. बाभळखुंटा ता. जि.बीड यास ताब्यात घेतले आहे. त्यांने या दुचाकी बीड, वडवणी, केज, सोलापूर येथून चोरल्याचे कबूल केले. हा दुचाकी चोरीच्या सवईचा सराईत आरोपी असून गेल्यावर्षी याच्या ताब्यातून चोरीच्या २२ दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या असेही स्थानिक गुन्हे शाखेने सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.महेश विघ्ने,पो.ह.महेश जोगदंड, पो.ह.जफर पठाण,पो.ह. दिपक खांडेकर, पोअं बाप्पासाहेब घोडके,चालक गणेश मराडे सर्व स्था.गु.शा. बीड यांनी मिळून केली आहे.