सहा लाखाची लाच घेताना CO ला रंगेहाथ पकडले.
माजलगाव नगर पालिका मुख्याधिकारी चव्हाणचा पापाचा घडा भरला.

माजलगाव नगर पालिका मधील भ्रष्टाचारामुळे मागील काही महिन्यापासून चांगलीच चर्चा होत असून गुत्तेदाराचे काम करण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करुन सहा लाख रुपयांच्या लाच स्विकारतांना राहत्या घरीच चव्हाणला छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.
चंद्रकांत चव्हाण असे माजलगाव नगर परिषदेतील लाचखोर मुख्याधिकार्याचे नाव आहे. काही शासकीय कामांशी संबंधित फाईल्स मंजूर करून देण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी गुत्तेदाराला 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भातील तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे करण्यात आली, त्यानंतर तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर एसीबीने सापळा रचला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास माजलगाव शहरातील पिताजी नगरी येथे किरायाच्या घरी चव्हाण याने सहा लाख रुपयांची लाच स्विकारली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीचे प्रमुख केशव दिंडे यांच्यासह त्यांच्या टिमने चव्हाणला रंगेहाथ पकडले. एसीबीकडून घर झडती घेतली जात असून रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरु होती. या कारवाईने माजलगाव शहरात खळबळ माजली आहे.
बीड एसीबीच्या पथकाकडून छापे
छत्रपती संभाजीनगरच्या टिमने कारवाई केल्यानंतर तातडीने बीड एसीबीला माहिती देण्यात आली. त्यानंतर बीड एसीबीचे दोन पथके तातडीने लाचखोर चंद्रकांत चव्हाणच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले होते. घरझडतीत काय कारवाई झाली याची माहिती रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही.