पिस्तूल हातात घेऊन व्हाट्सअप स्टेट्स ठेवल्याने गुन्हा दाखल.
गणेश मुंडे,रामदास मुंडे,पांडुरंग मुंडेंकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न.

बीड दि.१२ (प्रतिनिधी):- हातात पिस्तुल असल्याचे फोटो व्हॉटस् अॅप स्टेटस्ला ठेवून ते व्हायरल करत केज परिसरातील समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे (सर्वरा. देवगाव ता. केज) आणि रामचंद्र परसराम ओमासे (रा. बेडग ता. जि. सांगली) या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका हॉटेलमध्ये बसून मद्यप्राशन करत हातात पिस्तूल घेऊन फोटोसेशन केल्यानंतर तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार शनिवारी घडला. हॉटेलमध्ये बसलेल्या तीन व्यक्तिंच्या हातात पिस्तूल असल्याचे आणि समोर टेबलवर ग्लास असल्याचे व्हायरल फोटोमध्ये दिसून आले. या प्रकरणात केज पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रकाराविषयी अधिक माहिती समोर आली.प्रथम पिस्तूल नकली असल्याची माहिती देण्यात आली होती परंतु ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणी केज पोलीस ठाण्यातील पो.हे.कॉ. उमेश बाबुराव आघाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास देवगाव ता. केज येथे गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे, पांडुरंग रामा मुंडे (सर्व रा. देवगाव ता. केज) आणि रामचंद्र परसराम ओमासे -रा.जि.सांगली यांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या पिस्तूल हातात बाळगून त्याचे फोटो व्हॉटस्अॅप स्टेटस्ला ठेवून ते व्हायरल केले.केज परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १२३, ३७ (१) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार वाघमारे हे करत आहेत.