प्रेम प्रकरणातून झालेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू.
इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू.

तलवाडा दि.१९ (प्रतिनिधी) :-मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात मारामाऱ्या, खुनाच्या घटना मध्ये वाढ झाली असून प्रेमप्रकरुनातून तरुणांचा खून झाल्याने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे गंगावाडी या गावात पाच लोकांनी मोटार सायकल अडवून शिवम काशिनाथ चिकणे वय वर्षे २१ या तरूणास बेदम मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची फिर्याद शुभमचे वडील काशिनाथ चिकणे यांनी दिल्यानंतर पाच जणांविरुद्ध तलवाडा पोलिस ठाण्यात शुक्रवार दि.१८ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु शुभम काशिनाथ चिकणे या तरूणाचा छत्रपती संभाजीनगर येथील जे.जे.हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला असून या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेविषयी माहिती अशी की शिवम काशिनाथ चिकणे वय वर्षे २१ हा माजलगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता व त्याचे गावातील मुलीसोबत प्रेम संबंध होते व त्यातूनच माझ्या मुलाला एकटा गाठून शिवम गणेश यादव, सत्यम मांगले, गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ यादव, ईश्वर यादव यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद मयत मुलाचे वडील काशिनाथ चिकणे यांनी शुक्रवारी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.
वरील पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात शुभम चिकणे याचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दि.१५ जुलै रोजी मुलगी नामे आकांक्षा गणेश यादव हिने ती घरी एकटी असताना मयत शुभम चिकणे यास फोन करून तिच्या घरी बोलावून घेतले होते. तो तिथे गेला असता त्याठिकाणी आकांक्षा हिचा भाऊ शिवम गणेश यादव व त्याचा मित्र सत्यम मांगले हे दोघे त्याठिकाणी आले, त्यावेळी त्यांचे आपसात किरकोळ भांडण झाले होते. ते भांडण गावातील काही लोकांनी सोडविले असे फिर्यादी काशिनाथ चिकणे यांनी म्हटले आहे. त्यानंतर या घटनेचा व जुन्या भांडणाचा राग मनात धरून वरील पाच आरोपींनी शुक्रवार दि.१८ जुलै रोजी शुभम यास गाठून मारहाण केली असता तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता वरील आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती तलवाडा पोलिसांना दिली आहे.वरील आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना झाली आहेत.