
बीड जिल्ह्यात अवैध शस्त्र,पिस्तूल बाळगणाऱ्याच्या प्रमाणात दिवसेंन दिवस प्रचंड वाढ झाली असून जिल्ह्यात पिस्तूल कोण पुरवते याचा शोध घेणे बीड पोलिसांपुढे आवाहन झाले आहे.
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी एका व्यक्तीकडून गावठी पिस्तूल जप्त करून त्याला अटक केली आहे. किशोर रामभाऊ माटे (वय 37, रा. लोणी, ता. जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.04.08.2025 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पिंपळनेर ते लोणी फाटा रस्त्यावर ओमकार हॉटेलसमोर एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपोनि घुगे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गोलवाल, ग्रेपोउपनि शेळके, पोलीस नाईक बांगर, पोलीस शिपाई पठाण पो शी पिंपळे आणि पोलीस शिपाई सानप यांच्यासोबत दोन पंचांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
हॉटेल ओमकारसमोर संशयित व्यक्ती उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस एक अर्धवट गंजलेले लोखंडी गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुलाच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
जप्त केलेल्या गावठी पिस्तूलाचे अंदाजित मूल्य 40,000/- रुपये आहे. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करून पिस्तूल जप्त केले आहे. आरोपीने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह भारतीय न्याय संहिता, 2023 कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे, पोलीस उपनिरीक्षक गोलवाल, ग्रेपोउपनि शेळके, पोलीस नाईक बांगर, पोलीस शिपाई पठाण, पो शि पिंपळे आणि पोलीस शिपाई सानप यांनी केली आहे.