बीड मध्ये छावा संघटनेची पत्रकार परिषद.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केले गंभीर आरोप.

बीड ( प्रतिनिधी,) अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज बीड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी छावा संघटनेच्या शेतकरी सेलचे नेते विजय घाडगे, जिल्हाध्यक्ष अशोक रोमन, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विजय घाडगे यांनी सांगितले की, “लातूर येथे आमच्यावर वाहन घातक हल्ला केला गेला, त्यानंतर आम्ही अजित पवार यांना भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की गुन्हेगारांना पक्षात घेतले जाणार नाही. मात्र त्याउलट त्यांनाच पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. हा शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात आहे.”
त्यांनी पुढे विचारले की, “गुंडांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांना प्रमोशन देण्याची नवी पद्धत अजित पवार गटाने सुरू केली आहे का? गुंड पोसण्याचे काम सुरु झाले आहे का?” असा प्रश्न छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना घाडगे म्हणाले की, “अजित पवार गट शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे. सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, कापसाला चांगला भाव मिळावा ही आमची मागणी आहे. पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला असून ‘एक रुपयाची योजना’ ही शेतकऱ्यांसाठी नव्हती तर फसवणूक होती.”
छावा संघटनेने इशारा दिला की, “ज्यांनी शेतकऱ्यांच्या पुत्रावर हल्ला केला तेच जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, हे दुर्दैव आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश करू देणार नाही. गाव बंदी आंदोलन छावा संघटनेच्या वतीने करण्यात येईल.”पत्रकार परिषदेत संघटनेने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छावा संघटना लढा देणार असून “सत्याचा माज जिरवलाच पाहिजे” असा इशारा दिला देण्यात आला.