नशामुक्तीसाठी पोलीस अधीक्षकासह बिडकर पहाटे धावले !
पोलिस अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग,नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली.

बीड(प्रतिनिधी)अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त बीड जिल्हा पोलीस दलाने नशामुक्त समाज सुरक्षित भविष्य या निर्धारातून रविवारी पहाटे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले.छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण येथून सकाळी ५ वाजता या मॅरेथॉनला प्रारंभ झाला.
शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणातून काल बीड जिल्हा पोलीस दलाकडून नशा मुक्ती जनजागृतीसाठी मोटरसायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत पोलीस अधीक्षकांसह पोलीस विभागातील विविध अधिकारी, पत्रकार, समाजसेवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. रॅलीचे प्रमुख उद्दिष्ट युवकांमध्ये नशाबंदीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि समाजात नशा मुक्तीचा संदेश पोहचवणे होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी विविध रस्त्यांवरून मार्गक्रमण करत नागरिकांना नशापासून दूर राहण्याचे महत्त्व सांगितले.
बीड शहर व जिल्ह्यातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती,व्यापारी, समाजसेवक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्वतः मोटरसायकलवर बसून रॅलीत सक्रिय सहभाग घेतला आणि सहभागींचा उत्साह वाढविला. रॅलीतून नागरिकांमध्ये नशापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले गेले व जनजागृतीला चालना मिळाली.
५ व १० किलोमीटर अशा दोन गटांत विभागलेल्या या स्पर्धेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार, विद्यार्थी व हजारो युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. नशाबंदीची हाक देत, व्यसनमुक्त समाजाचे सामर्थ्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. व्यसनमुक्त जीवनशैली हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. नागरिकांनी एकजुटीने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले. हा उपक्रम बीड जिल्हा पोलीस दलाच्या कटिबद्धतेचे प्रतीक ठरला असून व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या चळवळीला नवे बळ मिळाले आहे. बीड जिल्हा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी,व्यसनमुक्त समाजासाठी मॅरेथॉन रॅली घेऊन समाजासाठी अनोखा संदेश दिल्याने सर्वच स्तरातून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे कौतुक होत आहे.