संततधार पावसाने मोमीनपुरा भागात घरात शिरले पाणी,भिंत पडली.
नगरपालिकेचा गलथान कारभाराने बीड शहराला आले तळ्याचे स्वरूप.

बीड(प्रतिनिधी) हवामान खात्याने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस होणार असा अंदाज दिला होता.त्याचं प्रमाणे संततधार दमदार हजेरी लावल्याने मराठवाड्याला चांगलेच झोडपले यामुळे नदी,नाल्या,तलाव ओसंडून वाहत आहेत.
बीड शहरात दिनांक १४ सप्टेंबर रविवार रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहरातील मोमिनपुरा भागासह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून,घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे व अंधार असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली
नगरपालिकेने पावसाळापूर्वी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाल्यांची व जलमार्गांची योग्य साफसफाई करण्यात आलेली नव्हती. परिणामी पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता थेट नागरिकांच्या घरात शिरले.यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की,पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करून पाणी वाहून नेण्याची व्यवस्था करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे.
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मोमीनपुरा भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरगुती साहित्य,अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.
दरम्यान, नागरिकांनी तातडीने पाणी उपसा व स्वच्छतेच्या कामांना सुरुवात करून झालेल्या नुकसानीबाबत मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
मोमीनपुरा भागात पावसाचे पाणी शिरल्याने घराची भिंत कोसळली.यामुळे आर्थिक नुकसान,परंतु जीवितहानी टळली.
बीड शहरात रात्री झालेल्या संततधार पावसामुळे मोहनपुरा परिसरात मोठा अनर्थ टळला. मुसळधार पावसाचे पाणी घरात घुसल्याने एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पावसाचे पाणी घरात भरून राहिल्याने भिंतींमध्ये ओलसरपणा निर्माण झाला आणि अचानक भिंत कोसळली. घरातील कुटुंबीय वेळेवर बाहेर आल्याने मोठा अपघात टळला. पण घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, घर राहण्यायोग्य उरलेले नाही.
नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली नाही.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी अशा घटना घडत आहेत. जोरदार झालेल्या पावसाने मोमिनपुरा भागातील घराचे ,वाहनाचे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने पंचनामे करून बाधित कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी कुटुंबाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.