
बीड : बीड शहरातील मोमिनपुरा भागातील एक तरुण दोन दिवसांपासून घराबाहेर निघून गेला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह पाली तलावात आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शहबाज सलीम खान (वय २५, रा. मोमिनपुरा, बीड) हा दोन दिवसांपूर्वी घरातून रागाने बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी पाली तलावात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची माहिती स्थानिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता, तो शहबाज खान याचाच असल्याचे समोर आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने मोमिनपुरा भागात शोककळा पसरली आहे.