त्रिवेणीबाई पाटील माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा.
"सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा"या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे व ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागृती.

लातूर/प्रतिनिधी: त्रिवेणीबाई पाटील माध्यमिक विद्यालय, नळेगाव येथे “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे व ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे मार्गदर्शन राजर्षी शाहु महाविद्यालय (स्वायत्त), लातूर आणि क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांचे ‘सायबर वॉरियर्स’ शैलेश जामगे व गायत्री हूडगे यांनी केले. इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यातून उद्भवणारे धोके लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी सायबर स्पेसमध्ये सुरक्षित रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, सोशल मीडिया हाताळताना कोणती दक्षता बाळगावी, तसेच सायबर फ्राॅड, फिशिंग यासारख्या गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय सगर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अशा कार्यशाळा काळाची गरज असल्याचे सांगितले आणि सर्वांना सायबर विश्वात जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून उत्साह दाखवला. मार्गदर्शन सत्रानंतरच्या प्रश्नोत्तर सत्रामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला.
अशा कार्यशाळा भविष्यातही राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.