
बीड(प्रतिनिधी)बीड दि. 12 ऑक्टोबर 2025, बीड मागील दीड महिन्यापूर्वी पाचेंगाव परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचेंगाव परिसरातील शेतात वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबास एका अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 500/2025 कलम 304, 309(4), 3(5) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी जिल्ह्यातील मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांचा तपास वेगाने करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली.
त्यानुसार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी भोसले व त्याचे साथीदार गेवराई येथे जातेगाव फाट्यावर थांबलेले आहेत. तत्काळ पथकाने छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले गळ्यातील सोन्याची कंठी व डोरले असे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीने पाचेंगाव शिवारातील शेतकऱ्यांना लुटल्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्यातील आरोपीसह मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस ठाणे गेवराई येथील पोलीस हवालदार पिंपळे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, दीपक खांडेकर, आश्पाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, तसेच चालक हवालदार नितीन वडमारे यांनी केली.