वक्फ बोर्ड विरोधात आंदोलन करत,शहरातील 15 मिनिट बत्ती गुल.
वक्फ बोर्ड विधेयक विरोधात बीडमध्ये मुस्लिम बोर्डचे आंदोलन.

वक्फ बोर्ड संबंधित विधेयकाचा तीव्र विरोध करत अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने आज रात्री ९ ते ९.१५ या वेळेत बीड जिल्ह्यासह संपूर्ण भारतात निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी आपल्या घर, दुकानं, कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील विजेचे दिवे १५ मिनिटांसाठी बंद ठेवून शांततेत निषेध नोंदवला.
बीड शहरातील बशिरगंज कारंजा,अजिस्पुरा, मोमीनपुरा, बालेपिर, जालना रोड, काझी नगर यासह अनेक भागांमध्ये लाईट बंद करून आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात देखील नागरिकांनी १५ मिनिटे वीज बंद करून विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त केली.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने या विधेयकाला विरोध करताना भविष्यात अधिक व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बीड जिल्ह्यातील जनतेने शांततेत आणि संघटित पद्धतीने या आंदोलनात सहभाग घेतल्याने या आंदोलनाची राज्यभरात चर्चा होत आहे.हे आंदोलन संसदेत मंजूर करण्यात आलेल्या वक्फ विधेयकाच्या विरोधात असून, मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला आहे.