
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने भुजबळ हे पक्षात नाराज होते.त्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवत राष्ट्रवादिच्या कार्यक्रमाला पाठ दाखवली होती.
पक्षात नाराज असलेल्या छगन भुजबळ यांचा आज दि. 20 मे रोजी सकाळी दहा वाजता राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. विशेष म्हणजे धनजंय मुंडे यांच्या जे खाते होते ते अन्न व नागरी पुरवठा खाते आता भुजबळांकडे जाणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक वाल्मिक कराड हेच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व खंडणीतील आरोपी असल्याने कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे.त्यांच्यावर मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीयं असल्याने धनंजय मुंडे यांना खऱ्या अर्थाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यापासून त्यांच्याकडील अन्न व पुरवठा खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले होते.परंतु आता हेच खाते छगन भुजबळ यांना दिले जाणार आहे.
छगन भुजबळ यांना अन्न व पुरवठा पदाचा अनुभव असल्याने त्यांना हे मंत्रपदाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. दरम्यान भुजबळांच्या या प्रवेशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून भुजबळ समर्थकात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले.