
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली आहे.
मात्र तरी देखील मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ते आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, त्यांची तब्येत खालावली आहे.
दरम्यान दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री 1 वाजेच्या दरम्यान सलाईन लावण्यात आलं. सोलापूर मधील आमदार राजेंद्र राऊत हे काल रात्री 1 वाजता जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते. राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली. त्यांनतर राऊत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर सलाई लावलं.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की, आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही, सरकारच्या वतीनं आरक्षण विषय लवकर तडीस नेण्याचं आश्वासन मिळालं आहे. आमदार राऊत निरोप घेऊन आले होते. आश्वासन मिळाल्यानं सलाईन लावलं आहे. मराठा बांधव मला भेटायला येत आहेत, त्यांनी इकडे येऊ नये. मराठा बांधवांनी इकडे गर्दी करू नये. शेतीची कामं उरकून घ्यावीत. मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी. सर्वांनी या आपल्या एकजुटीचा धसका घेतला आहे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.