जीवे मारण्याचा उद्देशाने भरधाव स्कार्पिओने पाठलाग करुन दोघांना उडविले.व्हिडिओ व्हायरल.
दोघांची प्रकृती चिंताजनक.शहर पोलिस ठाण्यात ६जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

बीड(प्रतिनिधी)भरधाव स्कार्पिओने स्कुटीवरील दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने उडविल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यासमोरील डीपीरोड,स्टेडियम रोडवर घडला.
या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सहा जणांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एकाला अटक करण्यात आली आहे.
बीड शहरातील मोहम्मद समी मोहम्मद कलीम शेख (वय १८), रा. नालबंद गल्ली, बलभीम चौक, बीड आणि सय्यद दानिश सय्यद ऐतशाम उल हक (वय १९) रा. पात्रुड, ता. माजलगांव हे दोघे रात्री आपल्या स्कुटीवर घराकडे येत असतांना एका स्कॉर्पिओ चालकाशी त्यांचा जालना रोडवर वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यामुळे स्कॉर्पिओ जालना रोडवरून मोंढा रोड मार्गे त्यांचा पाठलाग करीत होती. डि. पी. रोडवरील सारडा कॅपीटलसमोर भरधाव स्कॉर्पिओने महमद समी आणि सय्यद दानिश या दोघांच्या मोटार सायकलला उडविले. दोघेही डोक्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाले. त्याचवेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांनी पाहीले आणि त्यांना उपचारासाठी दाखल केले.दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने बेशुद्ध पडले होते.भरधाव वेगाने उडवल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.त्यापैकी एकजण पाच मिनिटांनी उठण्याचा प्रयत्न केला परंतु काही सेकंदातच जमिनीवर कोसळला.
सदरील स्कार्पिओ कुणाची होती? त्यामध्ये कोण होते? याचा दिवसभर काहीच शोध लागला नाही. रविवारी रात्री उशिरा पोलीसांनी स्कार्पिओ पकडली. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत