पाठलाग करून स्कॉर्पिओने उडवणारे पोलिसांच्या ताब्यात.
पो.नि.बल्लाळ यांची तत्परता काही तासातच स्कॉर्पिओसह एकास पकडले.

बीड (प्रतिनिधी) – आमच्या गाडीला कट का मारला ? या कारणावरून स्कॉर्पिओतून पाठलाग करत स्टेडियम जवळ गायकवाड याच्या टोळीने स्कुटीवरील दोन युवकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने उडविल्याचा प्रकार रविवार दि. २९ जुन रोजी पहाटे २.१५ ते २.४५ च्या सुमारास घडला. यामध्ये दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात परशुराम गायकवाड, मोहन उर्फ राजु गायकवाड या दोघांसह अनोळखी चौघांवर बीड शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बीड शहर ठाण्याचे पो.नि. बल्लाळ आणि त्यांच्या टीमने दिवसभर शहरातील प्रमुख रस्त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासातच स्कॉपिओ गाडीसह हल्लेखोरांचा छडा लावला. गुन्ह्यात वापरलेली स्कॉपिओ गाडी जप्त करण्यात आली असून मोहन उर्फ राजु गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.
एसपी साहेब, सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या गँगचा बंदोबस्त करा बीड शहर आणि परिसरात अश्याच काही गँगने प्रचंड दहशत निर्माण केलेली आहे.सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या गँगचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळीच त्याच्या मुसक्या आवळा अशी मागणी होवू लागली आहे.
या प्रकरणी शेख अयाज शेख सलाउद्दीन यांच्या फिर्यादीवरून मोहन उर्फ राजु गायकवाड, परशुराम गायकवाड यांच्यासह अनोळखी चार अशा सहा जणांविरूध्द बीड शहर पोलीस ठाण्यात कलम १०९ (१), ३५१(३), ३५२, १२५ (ब) ३(५) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांच्या टीमने पीएसआय कुमावत, सय्यद शहेंशाह, पोलीस अंमलदार राठोड, बावनकर, पवार यांनी सदरील स्कॉर्पिओचा शोध घेण्यासाठी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर काही तासातच स्कॉर्पिओ क्रमांक .एम.एच.४४. के. २४०० जप्त करून मोहन उर्फ राजु गायकवाड याला गजाआड केले. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. कुमावत हे करीत आहेत.