वाल्मीक कराडच्या जामीन बद्दल ॲड.उज्वल निकम काय म्हणाले पहा !
वाल्मीक कराडला"जेल की बेल"३० ऑगस्टला फैसला.

बीड (प्रतिनिधी) केज येथील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक केली होती. या सर्वांनी आता जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर आज विशेष मकोका कोर्टात सलग 3 तास सुनावणी झाली. त्यात वाल्मीक कराडच्या वकिलाने 1 तास 45 मिनिटे युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली. विशेषतः वाल्मीक कराड याला अटक करताना कोणतेही कारण देण्यात आले नव्हते, अशी बाबही त्यांनी यावेळी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार हरकत घेतली. तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा युक्तिवादही त्यांनी सीडीआर दाखल करून जोरकसपणे फेटाळून लावला. सीडीआरनुसार वाल्मीक कराडने त्या दिवशी सुनील शिंदे यांना फोन केला होता. त्याची नोंद आहे. या संभाषणाशी संबंधित पुरावे योग्यवेळी कोर्टात सादर केले जातील, असे ते म्हणाले.
विष्णू चाटे हाच वाल्मीकचा राईट हँड !
यावेळी आरोपी विष्णू चाटे याच्याही वकिलांनी आपली बाजू मांडली. आपल्या अशिलावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा दावा त्यांनी केला. पण उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या या दाव्यावरही जोरदार हरकत नोंदवली. विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा राईट हँड आहे. त्याने वाल्मीकला पूर्ण मदत केली. त्यामुळे मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात आरोपीला नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विष्णू चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमीच कोर्टापुढे मांडत आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली. यामुळे विष्णू चाटेच्या वकिलांची चांगलीच पंचाईत झाली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय 30 ऑगस्टपर्यंत राखून ठेवला. त्या दिवशी आरोपींना जामीन मिळतो की त्यांना तुरुंगातच रहावे लागेल हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वाल्मीक कराडच्या वकिलांनी या प्रकरणी हायकोर्टाचे दार ठोठावण्याचे संकेत दिलेत.