परळीतील वारकरी शिक्षण संस्थेवर गाव गुंडाचा हल्ला !
विद्यार्थ्यासह गुरुकुल चालकाच्या वडिलाना जबर मारहाण,गुन्हा दाखल.

बीड : परळी येथील शाळेतून गुरुकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही?असे विचारत दोन तरुणांनी सुरुवातील धक्काबुकी केली. त्यानंतर सिद्धेश्वर नगर येथील नर्मदेश्वर गुरुकुलात घुसून 11 विद्यार्थ्यांना बेल्ट आणि बांबूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर याच मारकुट्या तरुणांनी गुरुकुल चालकाचे वडिल बालासाहेब शिंदे यांच्यावरदेखील प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे परळी शहरात एक खळबळ उडाली.
प्राथमिक मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार परळी येथील सिद्धेश्वरनगर येथे नर्मदेश्वर गुरूकुलम् नावाचे निवासी गुरुकुल असून या गुरुकुलात विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेत आहेत. यासोबतच ते शाळेत देखील जातात. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी गुरुकुलातले मुलं शाळेत गेले. मात्र, परीक्षा देऊन मुलं गुरुकुलाकडे परत येत असताना रस्त्यात त्या मुलांना दोन जणांनी अडवले आणि परीक्षेचे पेपर द्या म्हणत मुलांना तंबी दिली. भयभीत मुलं त्यांना विरोध करत गुरुकुलात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ हे दोन लोकदेखील गुरुकुलात धडकले. या गुरुकुलाचे चालक अर्जुन बालासाहेब शिंदे (वय 30) आहेत. ते सिध्देश्वर नगर परळी वैजनाथ येथे राहतात. ते ‘श्री क्षेत्र वारकरी शिक्षण संस्था’ चालवत आहेत. मात्र या घटनेवेळी ते गुरुकुलात उपस्थित नव्हते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
श्री नर्मदेश्वर गुरुकुलमध्ये ४२ विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेतात. गुरकुलाचे चालक अर्जुन शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझी भावजयी रेणुका सोपान शिंदे यांनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे फोन करून कळविले. यावेळी दिनेश रावसाहेब माने, रा. चाळीस पुटी रोड जवळ परळी वै, बाळु बाबुराव एकिलवाळे रा. सिध्देश्वर नगर परळी वै. ह्यानी विद्यार्थ्यांचे परीक्षा पेपर बघूद्या असे म्हणाले होते. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपर दिले नाही, याचा राग मनात धरून या दोन आरोपींनी गुरूकुलात जाऊन मुलांना मारहाण केली. त्यात गुरूकुलामधील विद्यार्थ्यांना त्यांनी जबर मारहाण केली आहे. यामध्ये अनेक मुलांना हाताला, पायाला, डोक्याला मारहाण झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना परळी येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरुकुल चालकाचे वडील गंभीर जखमीकाही विद्यार्थी तक्रार देण्यासाठी परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा वरील दोघे आरोपींनी परत गुरुकुलात जाऊन शिवीगाळ व धिंगाणा केला. यावेळी फिर्यादीचा वडिल बालासाहेब शिंदे हा तत्काळ गुरूकुलकडे गेला. यावेळी दिनेश रावसाहेब माने याने फरर्शीचा तुकड्याने त्यांच्या डोक्याला मारला आहे. बाळु बाबुराव एकिलवाळे याने शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीचे वडीलांना (बालासाहेब शिंदे) भाऊ सुदाम बालासाहेब शिंदे यांनी मोटार सायकलवर परळीतल्या सरकारी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्यांना अँडमिट केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कारणावरून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे.